WPL 2026 Orange Cap Race : MI बाहेर, तरीही हरमनप्रीतचा दबदबा कायम; स्मृतीकडे सुवर्णसंधी!
WPL 2026 Orange Cap महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 चा चौथा हंगाम अनेक चढ-उतारांनी भरलेला ठरला आहे. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ यंदा साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर पडला. 2023 आणि 2025 या दोन हंगामात विजेतेपद पटकावणाऱ्या MI साठी हा मोठा धक्का असला, तरी संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिनं आपल्या दमदार फलंदाजीने संपूर्ण स्पर्धेत आपला रुबाब कायम ठेवला आहे.
हरमनप्रीत कौरनं यंदाच्या WPL हंगामात ८ सामन्यांत ३४२ धावा केल्या असून ती सध्या ऑरेंज कॅप (Orange Cap) शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. संघ स्पर्धेबाहेर असतानाही वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर तिनं आपली छाप पाडली आहे. आक्रमक फलंदाजी, मोठ्या धावांची खेळी आणि निर्णायक क्षणांतील योगदान यामुळे हरमनप्रीत ही यंदाच्या हंगामातील सर्वात प्रभावी फलंदाजांपैकी एक ठरली आहे.
ऑरेंज कॅपच्या यादीत दुसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचीच नॅटली सायव्हर ब्रंट आहे. तिनं यंदाच्या हंगामात ३२१ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे WPL च्या इतिहासात १,००० धावा पूर्ण करणारी ती पहिली फलंदाज ठरली आहे. याच हंगामात तिनं स्पर्धेतील पहिले शतक झळकावत इतिहास घडवला. मात्र MI चा प्रवास थांबल्यामुळे तिच्याही धावसंख्येत आता भर पडणार नाही.
या दोघींनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) कर्णधार स्मृती मानधना. स्मृतीनं साखळी फेरीतील ८ सामन्यांत २९० धावा केल्या असून तिच्याकडे ऑरेंज कॅप जिंकण्याची मोठी संधी आहे. RCB चा संघ थेट फायनलमध्ये पोहोचला असल्याने स्मृतीला अजून किमान एक सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. फायनलमध्ये ५३ धावांची खेळी केली, तर ती हरमनप्रीत कौरला मागे टाकत नंबर वन स्थानावर पोहोचू शकते. संघाला दुसरे विजेतेपद मिळवून देण्याबरोबरच वैयक्तिक यशही तिच्या नावावर जाऊ शकते.
दरम्यान, UP वॉरियर्सची कर्णधार मेग लेनिंग हिनं २४८ धावा केल्या असल्या तरी संघ स्पर्धेबाहेर गेल्यामुळे तिची ऑरेंज कॅपची शर्यत इथेच थांबली आहे. गुजरात जायंट्सची कर्णधार एश्ली गार्डनर हिच्याकडेही हरमनप्रीतला मागे टाकण्याची संधी आहे. सध्या तिच्या खात्यात २४४ धावा असून दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा एलिमिनेटर जिंकून गुजरात फायनलमध्ये पोहोचल्यास तिला दोन सामन्यांत ९८ धावा करून ऑरेंज कॅप पटकावता येऊ शकते.
एकूणच, WPL 2026 मधील ऑरेंज कॅप रेस शेवटच्या सामन्यांपर्यंत रंगतदार ठरणार आहे. हरमनप्रीत आपले अव्वल स्थान कायम ठेवणार, की स्मृती किंवा गार्डनर बाजी मारणार, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा :





